जळगाव (प्रतिनिधी) रोटरी परिवारात यंदा रोटरी क्लब जळगाव ईलाईटचा समावेश झाला असून या क्लबचा पदग्रहण सोहळा पीडीजी राजीव शर्मा यांच्या मुख्य उपस्थितीत शुक्रवारी दुपारी हॉटेल प्रेसिडेंट कॉटेजमध्ये उत्साहात झाला. शर्मा यांच्या हस्ते चार्टर प्रेसिडेंट पदाचे नितीन इंगळे, तर मानद सचिव पदाचे सूत्र संदीप असोदेकर यांनी स्वीकारले.
नितीन इंगळे यांनी आगामी वर्षातील नियोजित कार्यक्रमांची माहिती दिली. सातपुडा पर्वतानजीकच्या किनगाव परिसरातील आदिवासी वस्त्या, पाडे, तसेच जामनेर तालुक्यातील खडकी परिसरातील तांड्यांवरील गरजूंसाठी भव्य आरोग्य शिबिर घेण्यात येईल. हॅपी स्कूल, शाळांमध्ये संस्कार वर्ग, झोपडीपट्टी परिसरात फिरते वाचनालय, फ्रि हँड, प्लास्टिक सर्जरी शिबिर, व्यापक स्वरुपात वृक्षारोपण आदी उपक्रम, विविध समाजोपयोगी कार्यक्रमही घेण्यात येतील, असे इंगळे यांनी सांगितले. रोटरीचे संघटन मजबूत करुन गरीब, गरजूंच्या उन्नतीसाठी आणि समाजोपयोगी उपक्रमांसाठी हातभार लावण्यात येईल. यासाठी सर्वांनी एकजुटीने, एकदिलाने सहकार्य करण्याचे आवाहन संदीप असोदेकर यांनी केले. विष्णू भंगाळे यांनी डीजी रमेश मेहर यांच्या संदेशाचे वाचन केले. क्लबतर्फे शिक्षण, आरोग्य, स्वच्छता सेवेला प्राधान्य देण्यात यावे. शेतकर्यांसाठी विविध उपक्रम राबविणे, त्यांना कृषिविषयक साधनसामग्री उपलब्ध करुन देण्यात यावी. मुलींना स्वयंसिद्ध प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविण्यावर भर देण्यात यावा. गरजूंना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी लघुउद्योगाबाबत विचार व्हावा, असा संदेश डीजी मेहर यांनी दिला, असे भंगाळे यांनी सांगितले.
पॉझिटीव्ह विचारांचे दर्शन व्हावे
पॉझिटीव्ह विचार आपल्या वागण्या, बोलण्यातून इतरांना दिसले की, ते सुद्धा पॉझिटीव्ह जीवन शैलीचा अवलंब करतात. या पॉझिटीव्ह बदलाची सुरुवात स्वत:पासून करणे गरजेचे आहे. जळगावात आणखी नवीन क्लब वाढण्याची गरज आहे. त्यामुळे चांगली मंडळी एकत्र येऊन समाजहिताचे काम साधले जाईल. जास्तीत जास्त समाजोपयोगी उपक्रम राबवून त्याचा लाभ अधिक गरजूंना मिळेल, असे पीडीजी राजीव शर्मा यांनी सांगितले. या क्लबच्या प्रेसिंडेंट ईलेक्टपदी डॉ. पंकज शहा, उपाध्यक्षपदी अजित महाजन, सहसचिवपदी श्रेया कोगटा, सार्जेंट अॅट आर्म अॅड. पुष्कर नेहेते, कोषाध्यक्षपदी सचिन चौधरी, तसेच कार्यकारिणी संचालक म्हणून लक्ष्मीकांत मणियार, डॉ. मूर्तझा अमरेलीवाला, राजीव बियाणी, श्रीराम परदेशी, डॉ. वैजयंती पाध्ये, डॉ. श्रीधर पाटील यांचा समावेश आहे. प्रारंभी ईशा इंगळे हिने गणेश वंदना सादर केली. सूत्रसंचालन डॉ.वैजयंती पाध्ये यांनी केले. आभार डॉ.पंकज शहा यांनी मानले.
यावेळी नंदू परदेशी, विनायकराव असोदेकर, प्रभावती असोदेकर, काजल असोदेकर, चारू इंगळे, असिस्टंट गर्व्हनर डॉ. गोविंद मंत्री, संगीत पाटील, पीडीजी डॉ. चंद्रशेखर सिकची आदी उपस्थित होते.















