मुंबई (वृत्तसंस्था) मनसुख मिश्रीलाल हिरेन यांच्या हत्ये प्रकरणात कधीही अटक होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे यांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर १९ मार्चला सुनावणी होणार आहे.
ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून दहशतवाद विरोधी पथकानेही त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य कारवाईची शक्यता लक्षात घेऊन वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला आहे. सचिन वाझे सध्या मनसुख हिरेन यांच्या मृत्यूमुळे वादात अडकले आहेत. दरम्यान, वाझे यांची सरकारने क्राईम ब्रँचमधून बदली केली आहे. सचिन वाझे यांच्यावर मनसुख हिरेन या ठाण्यातील व्यापाऱ्याची हत्या केल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने दिलेल्या माहिती नुसार मनसुख यांची पत्नी विमला यांनी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकात FIR दाखल केली आहे. या एफआयआर नुसार सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. तसंच एफआयआर मध्ये पहिल्यांदा अज्ञात इसम असं आरोपीचे नाव नमूद करण्यात आलं होतं. तर दुसरीकडे एटीएसने आत्तापर्यंत वाझे यांची चार वेळा चौकशी केली आहे. तर संशयित कारच्या प्रकरणी तपास करणारी एनआयए पुढील काही दिवसांत वाझे यांची चौकसी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करून ठेवला आहे. दरम्यान, काल तब्बल नऊ तास मनसुख हिरेनच्या भावाची आणि मुलाची ठाणे एटीएसने चौकशी केली आहे.
मनसुख हिरेन यांच्या आर्थिक व्यवहारा विषयी हिरेन यांचा भाऊ व मुलगा यांची चौकशी करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याआधी परवा हिरेनची पत्नी आणि मुलाची सात तास एटीएसने चौकशी केली होती. मनसूखचा मृतदेह वाहून नेणाऱ्या रूग्णवाहिका चालकासह प्रत्यक्षदर्शींचाही जबाब नोंदवण्यात आला. मृतदेह काढला तेव्हा मास्कमध्ये चार ते पाच रूमाल आढळले होते. याबाबत जबाब नोंदवण्यात आला.
मुंबई क्राईम ब्रांचचे सचिन वाझे यांच्यावर हिरेन प्रकरणी आरोप करण्यात आले. हिरेन यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी केला होता. यानंतर वाझे संशयाचा भोवर्यात सापडले. हिरेन यांच्या मृत्यूचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले.