मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईला हादरावून सोडणाऱ्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळजनक दावा केला आहे. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केल्याचा संशय फडणवीस यांनी केला आहे.
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावरुन विधानसभेत खडाजंगी पाहायला मिळाली. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. विधानसभेत बोलताना फडणवीसांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या जबाबाचा उल्लेख करत सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केली आणि मृतदेह खाडीत फेकल्याचा संशय हिरेन यांच्या पत्नीने व्यक्त केला, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सचिन वाझे यांच्या विरोधात पुरावे असतानाही त्यांना अटक का होत नाही? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणा मुद्दा उपस्थितीत केला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांची पत्नी विमला यांचा पोलीस जबाबच सभागृहात वाचून दाखवला. ‘हिरेन यांच्या संदर्भात गुन्हा दाखल झालाय त्यासोबत त्यांच्या पत्नीचा जबाब महत्वाचा आहे. वाझे माझ्या पतीचे ओळखीचे होते. नोव्हेंबर २०२० मध्ये सदर कार वापरली होती. ४ महिने कार वाझे यांच्याकडे होती. २६-२-२०२१ वाझे सोबत माझे पती मुंबई गुन्हे शाखेत गेले होते. हिरेन यांची चौकशी फक्त वाझे यांनी केली आणि वाझे यांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली होती. चौकशी झाल्यानंतरही जो तक्रार अर्ज देण्यात आला तोही वाझे यांच्या सांगण्यावरून दिला होता. वाझे यांनी माझ्या पतीला अटक करु घ्यायला सांगितले होते, मग दोन तीन दिवसात बाहेर काढू असं सांगितले’, असा खुलासा फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये दाखल झालेल्या एफआयआरची आठवण करुन दिली. यामध्ये दोघा जणांनी ४० लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी दोन जणांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. जामीन मिळालेल्यांमध्ये धनंजय विठ्ठल गावडे आणि सचिन वाझे यांचा समावेश आहे. हे दोघेही कोणत्या पक्षाचे आहेत, सर्वांना माहिती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन आहे ते धनंजय गावडे यांच्या घराजवळ होतं आणि त्यांच्या ४० किमीवर हिरेन यांचा मृतदेह सापडला. याप्रकरणात आणखी किती पुरावे हवे आहेत? असा सवाल फडणवीस यांनी विचारला. सचिन वाझे यांच्याविरोधात इतके पुरावे असताना २०२ गुन्ह्याखाली अटक करण्यात यावी. सचिन वाझे यांनीच मनसुख यांची हत्या केल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.