मुंबई (वृत्तसंस्था) सचिन वाझेंचे सहकारी एपीआय रियाजुद्दीन काझी यांना एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. अँटिलीया प्रकरण आणि मनसुख हिरण प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. काझी यांची अनेक वेळा एनआयए अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती.
तपास यंत्रनेच्या माहितीनुसार, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात काझी संशयित आरोपी आहे. अँटिलिया प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेच्या सांगण्यावरुन हिरेन यांची हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने काझी यांची १५ मार्च, १६ मार्च, १७ मार्च, २० मार्च, २३ मार्च, २६ मार्च और २७ मार्च असे एकून सात वेळा चौकशी केली आहे. एनआयएचे म्हणणे आहे की, रियाजुद्दीन काझीची भूमिका ही आधीपासूनच संशयित वाटत असून तो सचिन वाझेचा अत्यंत जवळचा साथीदार होता. त्यामुळे त्यांच्याकडून अनेक महत्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता एनआयएने वर्तवली आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, काझीने २६ फेब्रुवारी रोजी सचिन वाझे राहत असलेल्या साकेत सोसायटीमध्ये जाऊन तेथील CCTV, DVR ताब्यात घेतले. त्यानंतर ते नष्ट करुन मीठी नदीत फेकून दिले होते. त्यामुळे एनआयएकडून त्याची सतत चौकशी सुरु आहे.
पीएसआयवरून एपीआय पदावर प्रमोशन झाल्यानंतर काझी यांची तिसरी पोस्टिंग मुंबई पोलिसांच्या सीआययु पथकात करण्यात आली. ९ जूनला सचिन वाझेंनी सीआययु पथकाचे इंचार्ज म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून काझी हे सचिन वाझे यांच्यासोबत काम करत होते. वाझे यांच्याशी चांगले संबंध असणारा अधिकारी म्हणून काझी यांची ओळख आहे. सचिन वाझे यांच्यासोबत कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी आणि प्रकाश ओव्हाळ यांची राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) चौकशी करत आहे. काझी यांची सशस्त्र पोलीस दलात तर ओव्हाळ यांची मलबार हिल पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली होती.