मुंबई (वृत्तसंस्था) मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी एनआयएच्या ताब्यात असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची तब्येत पुन्हा बिघडल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले होते.
सचिन वाझे यांना शनिवारी ११.३० च्या सुमारास एनआयएन अटक केली होती. सुमारे १३ तास त्यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. तसेच स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्यानंतर चालकाने मुंबई पोलिसांच्याच क्राईम ब्रांचच्या इनोव्हा कारमधून पलायन केले होते. ही इनोव्हादेखील एनआयएने ताब्यात घेतली असून रविवारी याच्या जोरावर वाझे यांची ११ दिवसांची कोठडी मिळविली आहे. मात्र, काल रात्री NIA च्या कार्यालयात सचिन वाझे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे NIA च्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री डॉक्टरांना पाचारण केले होते. हे डॉक्टर सचिन वाझे यांच्या प्रकृतीची तपासणी करून साधारण रात्री एक वाजण्याच्या सुमारास एनआयएच्या कार्यालयातून बाहेर पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, NIA ने यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
यापूर्वी शनिवारी रात्रीही सचिन वाझे यांची प्रकृती खालावली होती. एनआयएने त्यांची सलग १३ तास चौकशी केली होती. त्यामुळे सचिन वाझे यांना थकवा जाणवायला लागला होता. त्यामुळे सचिन वाझे मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात गेले होते. याठिकाणी त्यांना सलाईन लावण्यात आले होते, अशी माहितीही सूत्रांनी दिली होती. त्यानंतर आता सलग दुसऱ्या दिवशी सचिन वाझे यांच्यावर डॉक्टर बोलावून उपचार करण्याची वेळ आली आहे. सचिन वाझे यांच्या चौकशीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून NIA कडून त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.
मनसुख हिरेन प्रकरणामुळे चर्चेत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने रविवारी १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे आता सचिन वाझे यांची कसून चौकशी करण्याचा राष्ट्रीय तपासयंत्रणेचा (NIA) मार्ग मोकळा झाला होता.
















