धरणगाव (प्रतिनिधी) ना.गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक तथा माजी नगसेवक राजेंद्र महाजन यांचे हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी रात्री दु:खद निधन झाले. या घटनेमुळे धरणगावातील राजकीय,सामाजिक, उद्योजक जगतावर शोककळा पसरली आहे.
शिवसेनेचे तत्कालीन शहरप्रमुख, तथा नगरपालिकेचे माजी स्वीकृत सदस्य राजेंद्र महाजन यांचे शुक्रवारी रात्री आकस्मीक निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने जळगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालविली. राजेंद्र महाजन हे ना. गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक होते. आपल्या पदाचा राजीनामा देऊन ते भाऊंच्या समर्थनासाठी शिंदे गटात दाखल झाले होते. आगामी नगरपालिका निवडणुकीची धुरा देखील त्यांच्याकडे येणार असल्याचे संकेत होते. मात्र, शुक्रवारी रात्री अचानक त्यांच्या निधनाचे वृत्त येऊन धडकताच धरणगावच्या राजकीय, सामाजिक वर्तुळावर शोककळा पसरली. राजू महाजन यांची अकाली एक्झिट अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे. त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी राहत्या घरापासून निघणार आहे.