जळगाव (प्रतिनिधी) टायटन, फास्टट्रॅक,सोनाटा या नामांकीत कंपन्यांचे नाव असलेले डायल, डायल केस व डायल स विथ बेल्डचे बनावट उत्पादने विकणाऱ्या दुकानावर कंपनीच्या पथकाने मंगळवारी छापा टाकला. याठिकाणाहून सुमारे १६ हजार ६४० रुपयांचे बनावट उत्पादने जप्त करण्यात आली असून याप्रकरणी दुकानमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. नवी दिल्ली येथील गौरव शामनारायण तिवारी हे वकील असून त्यांची एसएनजी सॉलीसिटर एलएलपी नावाची लिगल फर्म आहे. त्यांना टायटन कंपनीच्या कोणत्याही मालाची नक्कल करुन त्या वस्तूंची विक्री किंवा उत्पादन तयार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार दिले आहे. त्यानुसार ते टायटन कंपनीचे सोनाटा, फास्टट्रैक या साख्या बनावट उत्पादन तयार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करीत असतात.
दि. ३१ ऑक्टोंबर रोजी गौरव तिवारी हे एसएनजी सॉलीसिटर फर्मचे तज्ञ सागर दत्ताराम आयरे यांना जळगावात बनावट टायटन कंपनीच्या वस्तूंची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी जळगाव पोलिसांसोबत पत्रव्यवहार करुन कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळण्याची मागणी केली. त्यांना शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल, पोहेकॉ उमेश भांडारकर, पोकॉ योगेश इंधाटे, अमोल ठाकूर, दत्तात्रय पाटील यांचे पथक तयार करीत कारवाईसाठी रवाना केले.
पोलीस बंदोबस्तात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी फुले मार्केटमधील आनंद टाइम सेंटर याठिकाणी छापा टाकून तपासणी केली. याठिकाणी त्यांना टायटन कंपनीच्या १६ हजार ६४० रुपयांचे बनावट डायल केस मिळून आल्या.जप्त केलेल्या डायल केस जप्त करुन तो मुद्देमाल बनावट असल्याचे प्रमाणपत्र पोलिसांना दिले आहे. याप्रकरणी गौरव तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दुकानमालक भारत चिमनदास तलरेजा ( वय ६५, रा. शालीमार सोसायटी, गणपती नगर) यांच्याविरुद्ध कॉपीराईट अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.