जळगाव (प्रतिनिधी) कामानिमित्त स्थायिक झालेल्या चोरट्याने दुचाकी चोरुन तो मध्यप्रदेशात कमी किंमतींमध्ये त्याची विक्री करणाऱ्यांचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे. मात्र यातील मुख्य संशयित अद्याप फरार असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.
मध्यप्रदेशातील खंडवा येथील संशयित कामानिमित्त एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास होता. शहरातील विविध भागातून तो दुचाकी चोरुन नेत मध्यप्रदेशातील पिपलोद येथे त्या दुचाकी कमी किंमतीमध्ये आपल्या साथीदारांच्या मदतीने विक्री करीत होता. दरम्यान, या संशयितांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी लांबवल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी लागलीच पथक तयार करुन कारवाईसाठी खंडवा येथे रवाना केले. या पथकाने खंडवा कारागृहातून अनोप धनसिंग कलम (कोरकु) (वय १८, रा. सुकवी, जि. खंडवा) व अंकीत सुकलाल ठाकूर (कोरकु) (वय २२, रा. मुसाखेडी इंन्दौर, मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दरम्यान, पथकाने त्या दोघांकडून जळगावातून चोरी केलेल्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
मुख्य संशयित अद्याप फरार !
कामानिमित्त आलेला मुख्य संशयित हा जळगावातून दुचाकी चोरी करुन मध्यप्रदेशात घेवून जात होता. याठिकाणी तो ग्रामीण भागामध्ये अत्यंत कमी किंमतींमध्ये तो त्या विक्री करीत होता. त्याच्या दोन साथीदारांना अटक केली, मात्र मुख्य संशयित अद्याप फरार आहे.
या पथकाची कारवाई !
ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोउनि दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, गफूर तडवी, पोना सुनिल सोनार, विकास सातदिवे, योगेश बारी, छगन तायडे यांच्या पथकाने केली.