मुंबई (वृत्तसंस्था) मी शेअर केलेलं जन्म प्रमाणपत्र खोटं असेल तर खरं कोणतं आहे हे वानखेडे परिवाराने किंवा समीर वानखेडे यांनी स्वत: समोर येऊन दाखवावं. त्यांचे वडील जातीचं प्रमाणपत्र दाखवत आहेत. समीर वानखेडेंनी जात प्रमाणपत्र जाहीर करावं, असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलं आहे.
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले. “आम्ही बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यामुळे अनेक गोष्टी समोर आल्या. मी एक स्पष्ट करतो की आमची लढाई एनसीबी या तपास यंत्रणेशी नाही आहे. गेली ३५ वर्षे एनसीबीने चांगलं काम केलं आहे. कधीच या संस्थांवर कोणी आरोप केले नाहीत. परंतु एक व्यक्ती जो फसवणूक करुन सरकार नोकरी मिळवतो, त्यावर आम्ही प्रश्न उपस्थित केले आहेत,” असं नवाब मलिक म्हणाले.
तो दाखला खराच, माझ्या दाव्यावर मी ठाम
“जी व्यक्ती बोगस जन्मप्रमाणपत्र आणि कागदपत्रे तयार करुन अनुसूचित जातीच्या माध्यमातून नोकरी मिळवतो याबाबत मी प्रश्न उपस्थित केला आहे. कुठेतरी अनुसूचित जातीच्या एखाद्याचा या बोगस प्रमाणपत्रामुळे अधिकार हिरावून घेण्यात आला. या लढाईला मी पुढे घेऊन जाणार आहे. मी माझ्या दाव्यावर कायम आहे. मी जे प्रमाणपत्र ट्विट केले आहे ते खरे आहे. त्याच्यावर समीर वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद आहे. समीर वानखेडेंच्या बहिणीचे जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध आहे. दीड महिन्यांच्या शोधानंतर हे प्रमाणपत्र आम्हाला मिळाले. समीर वानखेडेंच्या वडिलांनी वाशिम येथून प्रमाणपत्र मिळवले. त्यानंतर त्यांनी मुंबईत नोकरीला असताना जाहिदा खान यांच्यासोबत लग्न केले. त्यानंतर वडिलांच्या प्रमाणपत्राच्या आधारे आपले प्रमाणपत्र बनवले जे बोगस आहे. या प्रमाणपत्रावरुन काही जण तक्रार देखील दाखल करणार आहेत. फसवणूक करुन समीर वानखेडेंनी नोकरी मिळवली हे सिद्ध झाल्यानंतर सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. मला आशा आहे की सत्य समोर येईल. ज्यांचा हक्क त्यांनी हिरावून घेतला तो त्यांना मिळेल,” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
“मी कुणाचाही धर्म काढत नाही. माझा लढा हा एका मागासवर्गीयाचा अधिकार हिरावून बोगस कागदपत्राद्वारे नोकरी मिळवणाऱ्याच्या विरोधात आहे. या प्रकरणामध्ये समीर वानखेडेंचे वडील सांगत आहेत की मी कधी धर्मपरिवर्तन केले नाही. मग खरे जन्म प्रमाणपत्र तुम्ही आणा आणि सांगा मी दिलेले प्रमाणपत्र खोटे आहे. माझ्याकडे बरीच कागदपत्रे आहेत. माझ्याकडे असे पुरावे आहेत जे ते कधीही नाकारू शकत नाहीत,” असे नवाब मलिक म्हणाले.
“समीर वानखेडेंच्या वडिलांनी दावा दाखल करावा. ४९९, ५०० अंतर्गत त्यांना अधिकार आहे. अंधेरी किंवा कुर्ला कोर्टात जावं. मला आरोपी करावं. मी तिथे कायदेशीर लढाई लढत यांचा फर्जीवाडा समोर आणणार. मी दाऊद वानखेडे यांना आव्हान देतो की, माझ्याविरोधात ४९९, ५०० अंतर्गत तक्रार दाखल करा. मुलीनेही आम्ही अब्रुनुकसानीचा दावा दाखल कऱणार असल्याचं सांगितलं आहे. १०० कोटींची गोष्ट करु नका, त्यासाठी १० टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. तुमच्याकडे दोन नंबरचे १००० कोटी असतील पण स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी लागणारा कागद तुमच्याकडे नसेल. समीर दाऊद वानखेडे, दाऊद वानखेडे, यास्मिन वानखेडे यांनी दावा दाखल करा असं माझं आव्हान आहे,” असे मलिक म्हणाले.