मुंबई (वृत्तसंस्था) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधातील २५ कोटीच्या लाचखोरी प्रकरणी महाराष्ट्र सरकारने चौकशीची घोषणा केली आहे. सरकारने आदेश काढून चार अधिकाऱ्यांची नावेही जाहीर केली आहे.
समीर वानखेडेंवर झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी चार अधिकाऱ्यांची नेमकणूक केली आहे. यासंदर्भातील आदेश मुंबई पोलिसांचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी जारी केलेत. त्यामुळे आता या आदेशानुसार मुंबई पोलीस स्वतंत्र्यपणे या वानखेडेंवरील आरोपांची चौकशी करणार आहेत. एकीकडे नवाब मलिकांच्या आरोपांनी घायाळ झालेले समीर वानखेडे आता राज्य सरकारने लावलेल्या चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. त्यामुळे समीर वानखेडेंना आता दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे. पोलीस तपासाचे नेतृत्व अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणजेच एसीपी दिलिप सावंत करतील. या प्रकरणातील चौकशीसाठी नेमण्यात आलेले अधिकारी हे आझाद मैदान, कुलाबा पोलीस स्थानकातील प्रत्येकी एक तसेच मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील एक व अन्य एक अधिकारी सायबर सेलमधील असणार आहे.