जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात महावितरण कंपनीच्या अल्युमिनियमच्या अल्युमिनियमच्या तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पारोळा पोलिसांनी केला आहे. त्यांच्याकडून सांगवी शिवारात चारचाकीवाहनांसह चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला असून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाने सोमवारी १६ सप्टेंबर सायंकाळी ७ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार कळविले आहे.
जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात महावितरण कंपनीच्या अल्युमिनियमच्या तारांची चोरी झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा छळा लावावा असे आदेश पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी केले होते. त्यानुसार पारोळा पोलिसांनी सापळा रचून पारोळा गावातील सांगवी शिवारात इलेक्ट्रिक डीपीजवळ एका चारचाकी वाहन क्रमांक (एमएच १९ वाय ११९२) मध्ये संशयित आरोपी समाधान नारायण पाटील रा. एरंडोल याला ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता त्याने इतर दोन साथीदारांची नावे सांगितली. दरम्यान पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून संशयित आरोपी रवींद्र अनिल मिस्तरी रा. एरंडोल आणि धनराज प्रकाश ठाकूर रा. अमळनेर या दोघांना अटक केली आहे. पारोळा पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केली असता त्यांनी पारोळा हद्दीतील २ आणि एरंडोल हद्दीतील ३ ठिकाणी चोरी केल्याची कबुरी दिली आहे याप्रकरणी तिघांवर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजीव विठ्ठल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सुनील हटकर, प्रवीण पाटील, आशिष गायकवाड, योगेश शिंदे, अनिल वाघ यांनी केली आहे.