मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट करत राठोड यांच्या राजीनाम्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन”, असं लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो राऊत यांनी ट्विट केलं आहे. थोडक्यात मुख्यमंत्र्यांच्यावतीने राऊत यांनी ट्विट करत राठोड यांना एकप्रकारे इशारा दिल्याचं बोललं जातंय.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळेच राज्य विधिमंडळाच्या अधिवेशन पूर्वसंध्येला वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही याबद्दल सूचक ट्वीट केले आहे. राज्य सरकारच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. परंतु, अधिवेशनात सरकारची प्रतिमा मलिन होऊन नये, विरोधकांनी या मुद्यावरून सरकारला घेरू नये यासाठी शिवसेनेकडून संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. आज चहापानापूर्वी महा आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारच्या प्रतिमेवर चर्चा होणार आहे. संजय राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे. पण शिवसेनेच्या काही मंत्री, आमदारांनी संजय राठोड यांची पाठराखण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा आरोप झाले होते. पण, त्यानंतर महिलेनं तक्रार मागे घेतली होती. पण आरोपच काय? असा सवालही सेनेच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फोटो ट्वीट करून संजय राठोड यांच्यावर कारवाई होणार असे संकेत दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातात राजदंड असलेला फोटो राऊत यांनी ट्वीट केला आहे. ‘शिवरायांच्या हातातला हा राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन!’ असा मजकूर या फोटोवर लिहिलेला आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या राजीनामाच्या चर्चेला उधाण आले आहे.
उद्धव ठाकरे मिस्टर सत्यवादी
कालही औरंगाबादेत बोलताना त्यांनी राठोड यांच्या राजीनाम्यावर अगदी परखडपणे भाष्य केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे न्यायप्रिय नेते आहेत. ते मिस्टर सत्यवादी आहेत. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणात ते संपूर्ण सत्य जाणून घेऊन योग्य तो निर्णय घेतील. ते कुणालही अन्याय करणार नाहीत आणि कुणाला पाठीशीही घालणार नाहीत, असं ते म्हणाले होते.