मुंबई (वृत्तसंस्था) हिंदुत्वावरुन सध्या शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आहेत. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. राऊत यांनी भाजपाला उत्तर देताना एक व्यंगचित्र ट्विट केलं होतं. यावरुन भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी आता प्रत्युत्तर दिलं होतं. यावर आता संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
याविषयावर बोलताना राऊत म्हणाले की, ‘पुनम महाजन यांनी मी ट्विट केलेल्या व्यंगचित्रावरुन इतके अस्वस्थ होण्याचे कारण नव्हते. मी काही प्रमोद महाजन यांच्यावर वैयक्तिक टिका केलेली नव्हती. मला केवळ शिवसेना-भाजप युतीच्या सुरुवातीच्या काळात काय अवस्था होती, हे दाखवून द्यायचे होते. तसेच हे व्यंगचित्र मी काढलेले नव्हते. आर.के. लक्ष्मण यांचे हे व्यंगचित्र आहे. त्यावेळी ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या पहिल्या पानावर छापून आले होते. त्यामुळे पुनम महाजन यांनी एवढे अस्वस्थ होण्याची गरज नाही.
‘पुनम महाजन या भाजपच्या खासदार आहेत. मात्र आजकाल त्या कुठे आहेत, हे माहिती नाही. भाजप पक्ष रुजवण्यामध्ये प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि मनोहर पर्रिकरांचे मोठे योगदान आहे. मात्र आजच्या भाजपमध्ये महाजन, मुंडे आणि पर्रिकर कुटुंबीय अंधारात गेलेले आहेत.’ असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
संजय राऊतांचे ट्विट कोणते?
संजय राऊत यांनी ‘कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळे…बघा नीट’ असे कॅप्शन देत एक व्यंगचित्र शेअर केले होते. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एका खुर्चीवर बसले असल्याचे दिसत होते. यावेळी बाळासाहेब ठाकरेंचे पाय समोरील खुर्चीवर आहेत. तर समोर उभ्या प्रमोद महाजन यांना ‘हॅव अ सीट’ असे ते म्हणत आहेत. यावेळी खुर्चीच्या बाजूला एक छोटा स्टूल देखील होता.’ (राऊतांनी नंतर हे ट्विट डिलीट केले.)
काय म्हणाल्या होत्या पुनम महाजन?
या ट्विटवर पुनम महाजनांनी तिखट शब्दात टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, ‘स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका’ असे त्या म्हणाल्या होत्या.