मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबादमध्ये जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात केलेल्या विधानावरून राज्यात राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. अशा चर्चा सुरू असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा नेमका अर्थ सांगितला आहे. “मुख्यमंत्री ठाकरे यांची एक भाषण करण्याची स्टाईल आहे. ते भावी सहकारी असं म्हणाले. याचा अर्थ भाजपमधील काही नेते आघाडीत येऊ शकतात, असं राऊत म्हणाले.
“सरकार ५ वर्ष चालवायची कमिटमेंट आहे. शिवसेना शब्दांची पक्की असते. शिवसेना कधी विश्वासघात करत नाही, शिवसेना पाठीत खंजीर खुपसत नाही. शिवसेना दिलेला शब्द मोडत नाही. ही शिवसेनेची खासियत आहे. आम्ही सगळे त्याच मार्गाने चालतो. हे सरकार पडेल, या भ्रमात कुणी राहू नये. कुणाला पतंग उडवायची असेल तर त्यांनी जरूर उडवावी. तो पतंग कधी कापायचा आम्हाला माहिती आहे”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
“मुख्यमंत्री ठाकरे यांची एक भाषण करण्याची स्टाईल आहे. त्या पद्धतीने त्यांनी हे भाषण केलं आहे. त्यांनी असं कुठेही म्हटलेलं नाही की नवीन आघाडी होईल, आम्ही या सरकारमधून बाहेर पडू. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की ज्यांना भावी सहकारी व्हायचंय, ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. राजकारणात ज्या हालचाली दिसत आहेत. चंद्रकांत पाटील म्हणाले की आम्हाला माजी म्हणून नका, त्या याचबाबतच्या हालचाली आहेत. कुणीतरी तिकडे आहेत, ज्यांना इकडे यायचंय. त्यांच्यासाठी उद्धवजींनी संकेत दिलेत की तुम्ही या”, असं संजय राऊत म्हणाले.
नेमकं काय घडलं औरंगाबादमध्ये?
मुख्यमंत्र्यांची औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारत उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकाऱ्यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी मागे बघून त्यांनी भावी सहकारी म्हणून देखील संदर्भ दिला. त्यामुळे नेमका मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे आहे? याविषयी चर्चा सुरू झाली. “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे त्यावरून वेगवेगळे तर्क काढले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना मागे वळून व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तींकडे पाहिलं. यावेळी व्यासपीठावर रावसाहेब दानवे आणि भागवत कराड हे देखील उपस्थित होते.