मुंबई (वृत्तसंस्था) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी कनेक्शन असलेल्या युसूफ लकडावाला याच्याकडून नवनीत राणा यांनी ८० लाखांचे कर्ज घेतले होते, असा गौप्यस्फोट करतानाच याबाबत ईडीने चौकशी केली आहे का?, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.
युसुफ लकडावाला याचा कोठडीत मृत्यू झाला आहे. लकडावाला याला सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्याचा संदर्भ देत संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. राणा यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तीकडून कर्ज घेतले असल्याने हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न ठरतो. त्यामुळेच या प्रकरणात चौकशी झाली आहे का, याचे उत्तर ईडीने द्यायला हवे, असे राऊत यांनी नमूद केले आहे. राऊत यांनी नवनीत राणा यांनी घेतलेल्या कर्जाचे पुरावेच दिले असून आणखीही धमाका करण्याचे संकेत दिले आहेत.
‘रात अभी बाकी है…बात अभी बाकी हैं… जय महाराष्ट्र!!!’, असे एक ट्वीटही राऊत यांनी केले असून त्यात भाजपला टॅग केले आहे. त्यामुळे राऊत आणखी कोणता गौप्यस्फोट करतात, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
















