मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्याची प्राथमिक माहिती आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. यासंदर्भात आपणास काही कल्पना नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले. मात्र, आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन संजय राऊत यांनी गाण्याच्या ओळी शेअर करून केंद्र सरकारला एकप्रकारे आव्हान दिलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंना दोन दिवसांपूर्वीच ईडीकडून नोटीस मिळाली आहे. यासंदर्भात खडसेंनी कबुली दिली असून बुधवारी आपण चौकशीला हजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. आता, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार येत्या 29 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते. यासंदर्भात माध्यमांत वृत्त येताच खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राऊत यांनी एका चित्रपटातील गाण्याच्या ओळी दोन ओळी शेअर करत, बघुयात कुणामध्ये किती दम आहे? असं आव्हानच एकप्रकारे भाजपाला दिलंय. आ देखे जरा किसमे, कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथीया… असं राऊत यांनी म्हटलंय. वर्षा राऊत यांच्या आधी, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, विहंग सरनाईक आणि भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांनाही ईडीने नोटीस धाडली आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटमुळे आता राजकीय वातावरण चांगलच तापणार असल्याचं दिसून येत आहे. कारण, गेल्या २ दिवसांत महाविकास आघाडीतील २ नेत्यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत यांच्या खात्यात प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही प्रकारचे व्यवहार झाले. हा व्यवहार कसा झाला आणि त्यामागील कारण काय आहे हे ईडीला जाणून घ्यायचे आहे. वर्षा राऊत यांना संपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी बोलावण्यात आले आहे.