जळगाव (प्रतिनिधी) सिंगल वुमन फाउंडेशनतर्फे सामाजिक कार्यकर्त्या सरिता माळी-कोल्हे यांना माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते ‘नारीरत्न पुरस्कार २०२१’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम गुलाबराव देवकर मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये झाला.
सरिता माळी-कोल्हे यांनी कोरोनाच्या कालावधीत अनेक गरीब, गरजू रुग्णांना मदत केली आहे. बर्याच गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्या हातभार लावतात. त्यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला असून त्या अनेक महिलांना रोजगारासाठी प्रेरणा देत आहेत. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. तसेच सिंगल वुमन फाउंडेशनतर्फे विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटीत, काही कारणास्तव लग्न न करू शकलेल्या किंवा एकाकी जीवन जगणार्या महिलांसाठी कार्य करण्यात येते. या फाउंडेशनतर्फे कोरोनाच्या कालावधीत विधवा झालेल्या महिलांच्या पाल्यांना शिक्षणासाठीही मदत करण्यात आली आहे, अशी माहिती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मीनाक्षी रमेश चव्हाण यांनी दिली. फाउंडेशन आणि सरिता माळी-कोल्हे यांच्या कार्याचाही गौरव माजी पालकमंत्री देवकर यांनी केला. या वेळी शोभा चौधरी आदी उपस्थित होते.