नवी दिल्ली (वृत्तसंस्था) धर्मसंसदेच्या कार्यक्रमांमध्ये कथितपणे केल्या जाणाऱ्या हिंदुत्वासंबंधी वादग्रस्त वक्तव्यांवर सरसंघघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केलं आहे. मोहन भागवत यांनी या वक्तव्यावंर असहमती व्यक्त केली असून हे कार्यक्रम हिंदू विचारसरणीचं प्रतिनिधित्व करत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या विधानांशी आपण असहमत असून हे हिंदुत्व नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
मुंबईत रविवारी ‘राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदुत्व’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले की, धर्म संसदेत केलेली विधानं हिंदूत्वाला शोभेसे नाहीत. ते म्हणाले, ‘मी कधी रागात काही बोललो असेल तर ते हिंदुत्व नाही.’ रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेचा संदर्भ देत संघप्रमुख म्हणाले की, आरएसएस किंवा हिंदुत्वाचे अनुयायी अशा वत्कव्यांवर विश्वास ठेवत नाहीत. मोहन भागवत यांनी यावर बोलताना सांगितलं की, वीर सावरकरांनी हिंदू धर्मातील समुदायाच्या एकतेबद्दल, त्यांना संगठित करण्याबद्दल मत विचार मांडला होता. त्यांनी त्या गोष्टी भगवद गीतेचा संदर्भ देत मांडल्या होत्या. कुणालाही संपवण्यासाठी किंवा नुकसान करण्यासाठी ते बोलले नव्हते.
भारत देश हिंदु राष्ट्र होण्याच्या मार्गावर आहे का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, कुणी मान्य करो की न करो हा देश हिंदू राष्ट्र आहे. देशाच्या संविधान देखील हिंदुत्वाला पुरक आहे. पुढे ते असंही म्हणाले की, लोकांमध्ये भेद निर्माण करण्यात नाही तर समाजाला एकत्र आणण्यावर संघाचा विश्वास आहे.