रीवा (वृत्तसंस्था) एका साधूने दारू पिऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साधू सध्या फरार झाला असून त्याच्या शिष्याला अटक करण्यात आली आहे. एका किशोरवयीन मुलीनं या साधूवर जबरदस्तीनं दारू पाजून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
महंत सीताराम दास असंया हाय प्रोफाईल साधूचं नाव असून तो मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील सर्किट हाऊसमध्ये राहात होता. इथंच ही घटना घडल्याचं समोर आलंय. या महंताचा अनेक पॉश भागांतील उच्चभ्रू लोकांमध्ये वावर आहे. अतिरिक्त एसपी शिवकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताराम बाबा उर्फ समर्थ त्रिपाठी यानं रीवामधील सर्वात पॉश क्षेत्र असलेल्या सर्किट हाऊसमध्ये त्याच्या साथीदारांच्या मदतीनं हा कारनामा केला. आरोपी बाबाचा शिष्य विनोद पांडे याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेपासून बाबा फरार आहे. 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या हनुमान कथा महोत्सवात सहभागी होण्यासाठी आरोपी रीवा इथं आले होते.
1 एप्रिलपासून सिरमौर चौकाचौकात संकटमोचन हनुमान कथा होणार आहे. या कथेत श्री रामजन्मभूमी न्यासचे माजी सदस्य आणि माजी खासदार रामविलास वेदांती यांच्यासह महंत सीताराम दास महाराज यांचाही सहभाग होता. या कार्यक्रमाचे मोठमोठे बॅनरही शहरात लावण्यात आले आहेत. मात्र, कथेला सुरुवात होण्यापूर्वीच वेदांती महाराजांच्या शिष्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी 16 वर्षीय पीडित तरुणीनं सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी सतना येथील रहिवासी आहे.
काय आहे संपूर्ण घटना?
रीवा पोलिसात दाखल तक्रारीनुसार, विनोद पांडे यांच्या बोलावण्यावरून पीडित किशोरी सतना येथून रीवा इथं आली होती. विनोद पांडे हा शिक्षा झालेला जुना गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हेही दाखल आहेत. सोमवारी रात्री विनोदचे दोन साथीदार या किशोरीला आपल्यासोबत सर्किट हाऊसमध्ये घेऊन गेले. इथं तिची विनोद याच्याशी गाठ पडली. यानंतर तो तिला सर्किट हाऊसच्या चार क्रमांकाच्या खोलीत घेऊन गेला. इथं तो महंत आणि त्याचा एक शिष्य धीरेंद्र आला आणि सगळ्यांनी मिळून दारू प्यायली. त्यांनी या मुलीलाही दारू पाजण्याचा प्रयत्न केला. मुलीनं नकार दिल्यावर तिला जबरदस्तीनं दारू पाजली. दारू पिऊन झाल्यावर महंत आणि मुलगी सोडून सगळे बाहेर गेले आणि त्यांनी बाहेरून दरवाजा बंद केला. यानंतर महंतानं किशोरीवर बलात्कार केला.
बडे नेते, उद्योगपती, बिल्डर यांच्याशी संबंध
जिल्ह्यातील बडे नेते, उद्योगपती आणि बांधकाम व्यावसायिकही या महंताच्या निकटवर्तीयांमध्ये असल्याचं बोललं जातं. सीताराम दास जेव्हा रीवा इथं यायचा, तेव्हा त्याला भेटण्यासाठी या लोकांची रांग लागलेली असायची. यावेळीही तो एका बिल्डरनं फोन करून बोलावल्यावरूनच रीवा इथं आला होता. समदिया बिल्डर्सच्या ज्या कार्यक्रमासाठी तो आला होता, त्या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रंही छापण्यात आली होती.
आरोपी महंत फरार
रीवा येथील समदडिया मॉलच्या उद्घाटनप्रसंगी आरोपीचे गुरू आणि श्री रामजन्मभूमी न्यासचे माजी सदस्य आणि माजी खासदार रामविलास वेदांती यांची कथा होणार आहे. 1 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत हनुमान कथा व अष्टोत्तर शत रुद्राभिषेकाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. याच्या तयारीसाठी वेदांती महाराजांचा आरोपी शिष्य सीताराम दास रीवा इथं आला होता. तो या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची भेटला होता. आता तो फरार आहे.