सावदा ता. रावेर (प्रतिनिधी) गावातील पवन नगरमधील महादेव मंदिराजवळ गुप्तदान करण्याच्या नावाखाली एका भामट्याने वृद्ध महिलेची ६२ हजार ५०० रुपये किंमतीची सोन्याची पोत लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सावदा पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, वैशाली नवलसिंग चौधरी (वय ६२, रा. पवन नगर, सावदा) यांना दि. १३ रोजी साडेनऊ वाजेच्या सुमारास पवन नगर भागातील महादेव मंदीरासमोर रोडवर तोंडास मास्क लावलेला एक अनोळखी पुरूष भेटला. त्याचे वय अंदाजे ४० ते ४५ वयोगटातील होते. उंचीने मध्यम, शरीराने जाड मजबुत तर त्याने अंगात पांढरा शर्ट व काळी पॅन्ट घातलेली होती. या भामट्याने वैशाली चौधरी यांना मला गुप्तदान करायचे आहे. त्यामुळे तुमच्या गळयातील सोन्याची पोत त्याच्या कडील पैशाला लावायची आहे, अशी थाप मारली. एवढेच नव्हे तर वैशाली चौधरी यांना मंदीरासमोरील रस्त्यावर २० पावले चालण्यास लावले. याच दरम्यान, भामट्याने मोटार सायकलवरून पळ काढला. याप्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ जयराम खोडपे हे करीत आहेत.