अमळनेर (प्रतिनिधी) येथील धनदाई माता एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच शांतिनिकेतन प्राथमिक विद्यामंदिर, अमळनेर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब प्रा.डी. डी. पाटील यांच्या हस्ते सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सावित्रीमाई फुले यांनी दगड, शेण, गोटे झेलून सनातनी कर्मठांकडून होणारा अन्याय सहन करत महिलांना शिक्षित केलं. ‘चूल आणि मूल’ या बंधन बेडीतून स्त्रियांना मुक्त करत शिक्षणाचे अविरत कार्य केले. आज ज्या महिला विविध पदावर विराजमान झाल्या आहेत. हे केवळ सावित्रीमाईंच्या त्यागा मुळेचं म्हणून खऱ्या विद्येची देवता सावित्रीबाई यांचा जन्मदिन हा महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करूया, महिलांनी अंधश्रद्धेला बळी न पडता त्यांच्या स्री मुक्ती आंदोलनाची प्रेरणा घेऊया असे आवाहन करत त्यांनी मनोगत केले. याप्रसंगी जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शांतीनिकेतन प्राथमिक विद्यामंदिर, धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
















