भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील खडका येथील २२ वर्षीय विवाहितेला फोटो फ्रेमची ऑर्डर देण्याच्या नावाखाली भामट्यांनी १ लाख २० हजारांचा ऑनलाइन गंडा घातला. याप्रकरणी माधुरी मयूर पाटील (वय २२, रा. खडका, ता. भुसावळ) तालुका पोलिसांत अनोळखी भामट्यांविरोधात गुन्हा दाखल केला.
फिर्यादीत नमूद केले आहे की, दोन संशयितांनी ६ एप्रिलला मोबाइलवर संपर्क साधून १५ फोटो फ्रेमची ऑर्डर दिली. त्याचे माधुरी पाटील यांनी दोन्ही संशयितांना २० हजार ४९५ रुपये झाल्याचे सांगून पेमेंट मागितले. संशयितांनी त्यांना कूपन पाठवून ते स्कॅन करण्यास सांगितले. त्यातून तुम्हाला डबल पेमेंट मिळेल असे आमिष दाखवले. विवाहितेने कूपन स्कॅन केल्यानंतर संशयितांनी त्यांच्या बँक खात्यातून १ लाख २० हजारांची रक्कम लंपास केली. फसवणूक लक्षात आल्याने विवाहितेने सोमवारी तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून मनजीतसिंग (८४०३८४७३५८/ ७००८२३३५ ७९६) व संदीपकुमार (८८७६२३२७१७) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
















