नाशिक (वृत्तसंस्था) ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर साहित्य संमेलनात शाईफेक करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. संभाजी ब्रिगेडने हे कृत्य केले आहे. कुबेर लिखित ‘Renaissance State’ या पुस्तकाचा निषेध म्हणून संभाजी ब्रिगेडने शाईफेक केल्याचा दावा केला आहे.
नाशिकच्या साहित्य संमेलनाचा आज शेवटचा दिवस आहे. कार्यक्रमाची सांगता होत असताना आज एक परिसंवाद होणार आहे. या परिसंवादासाठी गिरीश कुबेर आज नाशिक मध्ये आले आहेत. या दरम्यान संभाजी ब्रिगेडने कुबेर यांच्यावर शाईफेक केली. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गिरीश कुबेर यांच्या निषेधाच्या घोषणा देवून छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करण्यात आला. गिरीश कुबेर यांची या बाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवसेना नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत या कृत्याचा निषेध केला आहे.
संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नितीन रोटे पाटील यांनी याबाबातची जबाबदारी स्विकारली आहे. याबद्दलनितिन रोटे पाटील म्हणाले, ‘संभाजी महाराजांवर गिरीश कुबेर यांनी पुस्तक लिहिले, त्यात संभाजी महाराजांनी आईची हत्या केली, महादजी शिंदे यांची बदनामी केली. त्याचा वचपा काढण्यासाठी संभाजी ब्रिगेड त्यांच्यावर लक्षच ठेवून होते, आज पट्ट्यात येतील, उद्या पट्ट्यात येतील, शेवटी आज ते संभाजी ब्रिगेडच्या वाघांना भेटलेच! शेवटी वचपा काढलाच असेही ते म्हणाले.