कोल्हापूर (वृत्तसंस्था) संस्थेच्या इमारतीच्या भाड्यापोटी एका शिक्षिकेकडून ९५ हजार ५७७ रुपयांची मागणी करून त्यातील ४५ हजार रुपये लाच स्वीकारताना धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथील संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित अण्णासाहेब विभूते विद्यामंदिराचे अध्यक्ष अजित उद्धव सूर्यवंशी, मुख्याध्यापक महावीर आप्पासाहेब पाटील, शिपाई अनिल बाळासाहेब टकले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून कारवाई केली आहे. या प्रकरणामुळे शिरोळ तालुक्यातील शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
धरणगुत्ती येथील संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित अण्णासाहेब विभूते विद्यामंदिराचे अध्यक्ष अजित उद्धव सूर्यवंशी यांनी संस्थेच्या इमारतीच्या भाड्यापोटी संस्थेतीलच एका शिक्षिकेकडून ९५ हजार ५७७ रुपये लाच स्वरूपात मागणी केली होती. सदरची रक्कम दोन हप्त्यात देण्याचे सांगून रक्कम न दिल्यास संबंधित तक्रारदार शिक्षिकेची वेतनवाढ रोखून त्यांच्यावर दबाव निर्माण केला होता.
संबंधित तक्रारदार शिक्षिकेने याबाबतची माहिती अनिल टकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवली होती. दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी यातील पहिल्या टप्प्यातील ठरलेली रक्कम रुपये ४५ हजार मुख्याध्यापक महावीर पाटील यांच्याकडे देण्याचे सांगितले होते. मुख्याध्यापक पाटील यांनी सदरची रक्कम शिपाई अनिल टकले यांना देण्यास सांगितले; मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात ते सापडल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे, पोलीस उपनिरीक्षक बंबर्गेकर, सहायक पोलीस फौजदार प्रकाश भंडारे, हेड कॉन्स्टेबल सुनील घोसाळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने, पोलीस कॉन्स्टेबल मयूर देसाई, रूपेश माने, संदीप पवार, पोलीस नाईक सचिन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल पूनम पाटील, चालक हेड कॉन्स्टेबल गुरव व हेड कॉन्स्टेबल अपराध यांच्या पथकाने केली. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.