चाळीसगाव (प्रतिनिधी) ग्रामीण भागात अनेकांना लसीकरण करताना अडचणी येत असल्याची ओरड कायमची झाली आहे. उपखेड येथील अनेक नागरिकांनी तीन महिन्यापूर्वी पहिला डोस घेतला होता. परंतू त्यांचे रजिस्ट्रेशन झालेले नाहीय, अशांना नागरिकांना दुसरा डोस नाकारण्यात येत आहे. अगदी आता रजिस्ट्रेशन करा आणि परत तीन महिन्यानंतर या असा अजब सल्ला दिला जात आहे.
चाळीसगाव तालुक्यातील उपखेड येथील अनेकांना लसीकरण करताना अडचणी येत आहे. ज्यांना पहिला डोस घेतल्याचा मेसेज आला नाही. तसेच त्यांच्याकडे प्रमाणपत्र उपलब्ध नाही. अशांना दुसरा डोस दिला जात नाहीय. त्यामुळे पहिला डोस घेतल्यानंतर नागरिकांच्या आरोग्याचा धोका कायम आहे. गावातील साधारण १५० नागरिकांचे रजिस्ट्रेशन झालेले नाहीय. त्यामुळे त्यांना दुसरा डोस नाकारण्यात येत आहे.
कोरोनाचा पहिला डोस घेतला. मोबाईल नंबरसुद्धा सांगितला. परंतु, फक्त ओटीपी आला रजिस्ट्रेशनचा मेसेज आला नाही. तसेच संबंधित केंद्रावर प्रमाणपत्रसुद्धा मिळाले नाही. याबाबत त्यावेळी विचारणा केल्यावर नंतर मॅसेज येऊन जाईल. तसेच प्रमाणपत्र देखील पुढील वेळेस मिळेल असे सांगण्यात आले होते. परंतू आता केंद्रावरील कर्मचारी दुसरा डोस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन होत नसल्याचे सांगतात. त्यामुळे दुसरा डोस घ्यायचा कसा?,. केंद्रावरील कर्मचारीसुद्धा व्यवस्थित माहिती देत नसल्याने आम्ही लस कशी घ्यायची, असा प्रश्न उपखेड येथील दीपक मगर यांच्यासह अनेक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
लसीकरणाच्या वेळी अशी घ्यायची काळजी
लसीकरण करताना केंद्रावर आपले नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर व्यवस्थित द्यावा, आपण दिलेली माहिती योग्य भरली की नाही याची शहानिशा करावी, लस घेतल्यानंतर मेसेज आला की नाही ते तपासून बघावे, मेसेज आला नसल्यास त्याबाबत माहिती द्यावी, लस घेतल्यानंतर प्रमाणपत्राची मागणी करावी.
अशा पद्धतीने घेता येऊ शकतो दुसरा डोस
पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जावे. लस घेतल्याचा पुरावा असेल तर आरोग्य विभागाशी संपर्क साधून ते प्रमाणपत्र मागावे. जर नंबर चुकीचा असल्यास केंद्रावरील कर्मचाऱ्यांना लगेच माहिती द्यावी. त्यानंतर ते सुधारित नंबर आपणाला देतील त्यावरुन आपणाला दुसरा डोस घेता येऊ शकते, असे आरोग्य विभागाने आधीच जाहीर केले आहे.