धुळे (प्रतिनिधी) मुंबईहून नाशिकमार्गे धुळ्याकडे परतताना चांदवडनजीक धुळ्याचे नगरसेवक किरण अहिरराव यांच्यासह त्यांच्या तीन जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू झाला. हृदयद्रावक म्हणजे अपघातापूर्वी काही मिनिटे आधीच चौघांनी सेल्फी काढला होता. त्यांचा हा फोटो दुर्दैवाने अखेरचा ठरला.
महसूल विभागात सेवेत असलेल्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त किरण अहिरराव व त्यांचे तीन मित्र चांदवडला आले होते. त्यानंतर ते मुंबईत रुग्णालयात उपचार घेत असलेले त्यांचे मित्र भूषण देवरे यांना भेटण्यासाठी गेले. सोमवारी (दि. १८) मुंबईहून धुळ्याकडे परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. सकाळी सात वाजेच्या सुमारास चांदवडजवळ आले असता नमोकर तीर्थजवळ कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात एवढा भीषण होता की, गाडीच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. कारच्या बोनेटपासून मागच्या सीटपर्यंतचा कारचा पत्रा पूर्णपणे चेपला गेला आहे. तर धडकेनंतर या कारचे छप्परही पूर्णपणे उखडले गेले आहे. अपघाताचे वृत्त धुळ्यात धडकताच मृतांच्या नातेवाईकांनी व मित्र परिवाराने चांदवडकडे धाव घेतली. दुपारी ४ पर्यंत चौघांचे मृतदेह अवधान व धुळे येथे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. त्यानंतर नगरसेवक किरण अहिरराव यांच्यावर सायंकाळी धुळ्यात, कृष्णकांत माळी यांच्यावर मोघ येथे तर अनिल पाटील व प्रवीण पवार यांच्यावर अवधान येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
चांदवड शिवारातील सोग्रस फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात मृत झालेले किरण अहिरराव, प्रवीण पाटील, अनिल पवार आणि कृष्णकांत माळी हे चौघेही जिवलग मित्र. किरण हरिश्चंद्र अहिरराव (वय ४८ रा. महिंदळे शिवार, साक्री रोड, धुळे) हे धुळ्यातील बालरोग तज्ज्ञ डॉ. महेश अहिरराव यांचे लहान बंधू होतं. धुळे महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत किरण अहिरराव हे भाजपाच्या तिकीटावर प्रभाग क्र. ६ मधून निवडून आले होते. तसेच त्यांच्या पत्नी भारती अहिरराव यादेखील यापूर्वी दोनवेळा धुळे जिल्हा परिषदेच्या सदस्या राहिल्या आहेत. किरण अहिरराव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, बहिण, असा परिवार आहे.
“कृष्णकांत चिंधा माळी हे मोघण येथील ज्ञानज्योती विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक चिंधा माळी यांचे सुपूत्र होते . मोघणचे माजी उपसरपंच असलेले कृष्णकांत हे सदर संस्थेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. कृष्णकांत हे बाबा नावाने परिचित होते. कोरोना काळात त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच दुसरा विवाह केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.