मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना चौकशीला बोलावण्यात आले आहे. पण, कोरोनाने आपण येऊ शकणार नाही, प्रश्नावली पाठवावी, त्याला ईमेलने उत्तर देते, असं उत्तर रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलच्या समन्सवर दिले आहे.
जबाब नोंदवण्यासाठी बुधवार २८ एप्रिल (आज) रोजी सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास शुक्लांना समन्समध्ये सांगण्यात आले होते. रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांना सध्या चौकशीला येऊ शकणार नसल्याचं कळवलं आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता हजेरी शक्य नसल्याचं उत्तर रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांनी दिलेल्या समन्सला दिलं. फोन टॅपिंग प्रकरणात चौकशीसाठी शुक्ला यांना समन्स पाठवण्यात आलं आहे. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैद्राबादमध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता रश्मी शुक्ला यांना मुंबईत चौकशीला हजर राहता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. चौकशीची खूपच घाई असेल, तर प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरे देईन, असं रश्मी शुक्ला यांनी सायबर सेलला सांगितलं.
रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.