मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील थेरोळा शिवारात उष्माघातामुळे तब्बल ६४ मेंढ्या अचानक मृत्युमुखी पडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यामुळे मेंढपाळांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
काकोडा (ता. मुक्ताईनगर) येथील रहिवासी असलेले नामदेव चोपडे, भरत मदने, भोजू मदने, ज्ञानेश्वर मदने यांच्या मालकीच्या मेंढ्या शुक्रवारी थेरोळा शिवारात चराईसाठी गेल्या होत्या. सायंकाळी अचानक मेंढ्या जमिनीवर कोसळू लागल्या आणि बघता बघता ६४ मेंढ्या दगावल्या. यात, मेंढपाळांचे सात ते आठ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे, नवनीत पाटील, थेरोळा सरपंच पांडुरंग तांबे विनोद पाटील, पंकज पांडव आदी उपस्थित होते. दरम्यान, प्राथमिक अंदाजानुसार, या मेंढ्यांना १८ तासांपासून पाणी पाजण्यात आले नाही. त्यामुळे उन्हाचा फटका बसून या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व्यक्त केला आहे