जामनेर (प्रतिनिधी) बोदवड रस्त्यावरील लहासर शिवारातील जंगलात पोत्यात हात-पाय बांधलेल्या व सुमारे ४० ते ४५ वयोगटातील प्रौढाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याची घटना १७ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
लहासर शिवारातील जंगलात १७ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गुराखी गुरे चारत होता. या वेळी तेथे त्याला दुर्गंधी आली. त्याने आजूबाजूला पाहिले असता एक पोत्यातूनच ही दुर्गंधी येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. हा प्रकार त्याने गावात कळवला. ग्रामस्थांनी लगेच पोलीस ठाण्याची संपर्क साधला. त्यानंतर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सहकाऱ्यांसोबत तत्काळ घटनास्थळ गाठले. बांधलेले पोते उघडून बघितले असता त्यात मृतदेह आढळून आला. मयत प्रौढाचे हात-पाय बांधून पोत्यात भरून ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनास्थळी चाळीसगाव व पाचोरा येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. याबाबत पोलीस कर्मचारी नीलेश वासुदेव घुगे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
दरम्यान, जांभुळ येथील एक इसम तीन महिन्यापूर्वी बेपत्ता झाला होता. त्याच्या मारेकऱ्यास पहूर पोलिसांनी अटक केली होती, मात्र मृतदेहाची कुठे विल्हेवाट लावली याबाबत त्याचेकडून कोणतीच माहिती मिळत नव्हती. या अनुषंगाने पहूर पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी देखील घटनास्थळी पाहणी केली. अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस निरीक्षक किरण शिंदे, एलसीबीचे निरीक्षक नजन पाटील यांचेसह फॉरेंसीक टीमने पाहणी केली. मृतदेह कुणाचा व त्याचा खुनी केला हे लवकरच पोलीस तपासातून समोर येणार आहे.
















