अकोला (प्रतिनिधी) बार्शीटाकळी तालुक्यातील आळंदा फाटा-कान्हेरी सरप दरम्यान मुख्य रस्त्याच्या कडेला गोधडीत बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. शुक्रवार, ८ सप्टेंबर रोजी दुपारी १:३० वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली असून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
बार्शीटाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बार्शिटाकळी ते अकोला जार्णाया मार्गावर डाव्या बाजूला, आळंदा व कान्हेरी सरप या दोन्ही गावाच्या मध्यभागी रोडच्या बाजूला अंदाजे ३० ते चाळीस वर्षीय अनोओळखी व्यक्तीची मृत अवस्थेत व गोधळीत बांधलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
मृतकाच्या गळ्यावर, चेहऱ्यावर जखमा होत्या. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खून मृतदेह फेकून दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहीती बार्शिटाकळी पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक शिरिष खंडारे व त्यांच्या पथकाने त्वरीत घटना स्थळाला भेट देत मृतदेहाचा पंचनामा केला.
मृतक व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता सदर मृतक हा आळंदा येथे त्याच्या नातेवाईकाकडे अनेक वर्षापासून राहत असल्याचे कळते. तसेच मयताचे नाव शांताराम रमेश नागे असे असल्याचेही कळते. मयताच्या घातपाताचे कारण अजूनही मात्र, स्पष्ट झालेले नाही.















