मालेगाव (वाशीम) नेहमीप्रमाणे शाळेत जाणाऱ्या एका शिक्षकावर अज्ञात व्यक्तींनी अचानक हल्ला करून जखमी केल्यानंतर अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना मालेगाव तालुक्यातील कोल्ही गावाजवळ सोमवारी ( ९ ऑक्टोबर) सकाळी अकराच्या सुमारास घडली. दिलीप सोनुने (५३, रा. मालेगाव असे मृतक शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मालेगावातील शेल्फाटा परिसरात वास्तव्यास असलेले दिलीप सोनुने हे तालुक्यातील बोरगाव येथील जि. प शाळेत कार्यरत होते. सकाळी ते नेहमी प्रमाणे आपल्या दुचाकीने शाळेत जायला निघाले. मालेगावपासून अवघ्या तीन किमी अंतरावरील कोल्ही परिसरात अज्ञातांनी त्यांची दुचाकी अडविली. यावेळी त्यांच्यावर रॉडने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्यानंतर अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळून टाकले.
या हल्ल्यात गंभीर जखमी सोनुने यांना उपस्थितांच्या मदतीने डॉ. शक्ती शेवाळे व चालक राहुल सांगळे यांनी रुग्णवाहिकेने वाशीम येथील जिल्हा रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कोल्ही येथील नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून तपास सुरु केला. या घटनेचे गांभीर्य ओळखत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत.
यानंतर फॉरेन्सिक पथकास पाचारण करून मारेकऱ्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सदर हत्याकांड हे शेतीच्या वादातून घडल्याची चर्चा सुरु आहे. परंतू पोलीस तपासातूनच सत्य समोर येणार आहे.