चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वरखेडे खुर्द येथे ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह गिरणा नदीपात्रात वाळूमध्ये अर्धवट पुरण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. मेहुणबारे पोलिसांनी एका संशयितास घेतले ताब्यात घेतले असून त्याने खुनाची दिली कबुली आहे. संतोष धोंडा भिल (वय ३०), असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
चाळीसगाव तालुक्यातील येथील संबंधित महिला बुधवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान गावालगतच्या खडक्या नाल्यात शौचासाठी गेली होती. ती लवकर घरी परत न आल्याने मुलांसह नातेवाईकांनी शोध घेत वरखेडे खुर्द शिवारात ज्ञानेश्वर शांताराम तिरमली यांच्या शेतात आले. त्या ठिकाणी रक्त सांडलेले दिसले काचेच्या तुटलेल्या बांगड्या दिसून आल्या. येथून पुढे गिरणा नदीपात्राकडे गेले असता अर्धवट बुजलेला मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिस पाटील संतोष तिरमली यांनी मेहुणबारे पोलिसांना माहिती दिली.
आरोपीना अटक करण्यात यावी, श्वानपथक बोलावण्यात यावे, त्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृत महिलेच्या नातेवाइकांनी घेतली होती. त्यामुळे मृतदेह तब्बल ८ तास मृतदेह पडून होता. नंतर फॉरेन्सिक विभागाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर मेहुणबारे पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप परदेशी, फौजदार गोपाल पाटील, पोकॉ. भूषण बाविस्कर, संजय पाटील, फॉरेन्सिकचे अधिकारी हरीश परदेशी तसेच नायब तहसीलदार चाळीसगाव आदींनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी संतोष भिल याला तात्काळ करण्यात आली. दरम्यान, त्याने पोलीस चौकशीत गुन्हा कबूल केला असल्याचे देखील कळते.