चाळीसगाव (प्रतिनिधी) गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी पूजेच्या प्रयत्नात असलेल्या नऊ जणांच्या टोळीला चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयिताकडून मोबाईल, कार आणि अघोरी पूजा करण्याचे साहित्य असा एकूण आठ लाख 35 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहरातील नागद रोडवरील नायरा पेट्रोल पंपसमोरील शेतातील पडीत घरात काही व्यक्ती आषाढ आमावस्या असल्याने पहाटे आघोरी पूजा करणार असल्याची माहिती गोपनीय माहिती चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल पवन पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंग देशमुख यांनी कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. यानंतर पोलिसांनी छापा टाकून नऊ संशयितांना ताब्यात घेतले.
लक्ष्मण शामराव जाधव (45, खडकी बायपास, ता.चाळीसगाव), शेख सलीम कुतुबुद्दीन शेख (56, हजरत अली चौक नागद रोड, चाळीसगाव), अरुण कृष्णा जाधव (42, आसरबारी, ता.पेठ, जि.नाशिक), विजय चिंतामण बागुल (32, जेल रोड नाशिक), राहुल गोपाल याज्ञीक (26, ननाशी, ता.दिंडोरी), अंकुश तुळशीदास गवळी (21, जोरपाडा, ता.दिंडोरी, जि.नाशिक), संतोष नामदेव वाघचौरे (42, अशोकनगर, नाशिक), कमलाकर नामदेव उशीरे (47, गणेशपूर पिंप्री, ता.चाळीसगाव), संतोष अर्जुन बाविस्कर (38, रा.अंतुर्ली (कासोदा, ता.एरंडोल) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
संशयित आरोपींनी मानवी खोपडी, लिंबू, नारळ, रुद्राक्ष माळ, देवाची पितळी मूर्ती, पिवळ्या धातुचा नाग, पत्रावरील छापील देव, कंदमुळे, गोलाकार पितळी धातुचे बेरकंगण, केशरी शेंदुर, अगरबत्ती पुडा, लोखंडी आडकीत्ता व कापुराची पुजा मांडुन गुप्तधना करीता अघोरी कृत्य करीत असल्याचे समोर आले. मोबाईल, कार आणि अघोरी पुजा करण्याचे साहित्य असा एकूण आठ लाख 35 हजारांचा मु्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कॉन्स्टेबल पवन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चाळीसगाव शहरचे पोलीस निरीक्षक संदीपप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक विशाल टकले, सहा.निरीक्षक सागर ढिकले, राहुल सोनवणे, महेंद्र पाटील, भूषण पाटील, रवींद्र बच्छे, समाधान पाटील, विजय पाटील, राकेश महाजन, आशुतोष सोनवणे, चालक नितीन वाल्हे व चालक गणेश नेटके, भरत गोराळकर, पवन पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे यांनी केली.