नाशिक (वृत्तसंस्था) अहमदनगर एमआयडीसीत केलेल्या मागील कामांचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात तसेच अनामत परत करण्याच्या बदल्यात एक कोटींची लाच स्वीकारताना अहमदनगर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता किशोर गायकवाड यास नाशिक एसीबीने अटक केली. शुक्रवार, 3 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता ही कारवाई करण्यात आली. या कारवाई मुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, लाच प्रकरणात तत्कालीन उपविभागीय अभियंता तसेच सध्या धुळ्यात कार्यकारी अभियंता असलेल्या गणेश वाघ यांनादेखील आरोपी करण्यात आलेय.
असे आहे लाच प्रकरण !
58 वर्षीय तक्रारदार आहेत. त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अहमदनगरच्या औद्योगिक वसाहतीत 1000 एमएम व्यासाची लोखंडी पाईपलाईन बदलण्याचे कामाचे मंजूर निविदेनुसार 31 कोटी 57 लाख 11 हजार 995 रुपयांचे पाच टक्के रकमेप्रमाणे एक कोटी 57 लाख 85 हजार 995 (पाच टक्केप्रमाणे) व अनामत रक्कम एक कोटी 57 लाख 85 हजार 995 रुपये तसेच या कामाचे सुरुवातीची सुरक्षा ठेव रक्कम 94 लाख 71 हजार 500 रुपये तसेच झालेल्या कामाचे अंतिम देयक 14 लाख 41 हजार 749 असे एकूण दोन कोळी 66 लाख 99 हजार 244 रुपये तक्रारदार यांना मिळावे यासाठी आरोपी गणेश वाघ यांचा मागील तारखेचे आऊट वर्ड करून त्यावर वाघ यांच्या सह्या घेऊन हे देयक त्यांच्याकडे पाठविण्याचा मोबदल्यात आरोपी किशोर गायकवाड यांनी स्वतः साठी तसेच गणेश वाघ यांच्यासाठी व यापूर्वी अदा केलेल्या बिलांचे बक्षीस म्हणून एक कोटींची लाच 20 ऑक्टोबर 2023 रोजी मागितली व लाच ठरल्याप्रमाणे रक्कम देण्याचा दिवस शुक्रवार, 3 नोव्हेंबर निश्चित करण्यात आला. सुरूवातीला गायकवाड व नंतर वाघ यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, ठरल्याप्रमाणे आरोपी गायकवाड नगर ते संभाजीनगर रोडलगत मोकळ्या पटांगणात इनोव्हा गाडीतून आला. तेथे त्याने पंचासमक्ष ही रक्कम स्वीकारली. एवढेच नाही तर तेथूनच आपल्या मोबाईलवरून दुसरा आरोपी वाघ याला फोन केला. लाचेच्या रकमेचे वाटप करण्यासंबंधी त्यांच्यात संभाषण झाले. गायकवाड याने सांगितले की, पैसे मिळाले आहेत. तुमच्या हिस्स्याची रक्कम कोठे पाठवू? यावर वाघ याने विचारले काय केलं त्यांनी? त्यावर गायकवाड म्हणाला, यांनी दिले सर ते एकच पाकिट. यावर वाघ म्हणाला, राहु दे तुझेकड़ेच. बोलतो मी तुला. ते तुलाच एका ठिकाणी पोहचवायचे आहे. कोठे ते सांगतो मी तुला नंतर. सध्या ठेव तुझ्या सेफ कस्टडीमध्ये, असे वाघ याने गायकवाड यांना सांगितले.
यांनी केला सापळा यशस्वी !
हा सापळा पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार (रीडर) यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, किरण धुळे, सुरेश चव्हाण आदींच्या पथकाने यशस्वी केला.