जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात असलेल्या स्टेट बँक शाखेत आज अज्ञात दरोडेखोरांनी सकाळी दरोडा टाकीत तब्बल 15 ते 17 लाख लुटून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ असलेल्या स्टेट बँक शाखेत आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दोन अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश केला. सकाळची वेळ असल्याने बँकेत कर्मचारी वगळता जास्त लोकं नव्हती. कोयत्यासारखे धारदार शस्त्राच्या धाकावर दरोडेखोरांनी व्यवस्थापकासह बँकेच्या कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले. आणि अवघ्या काही मिनिटात साधारण 15 ते 17 लाखाची रोकड आणि सोन्याचे दागिने लुटून पोबारा केला. दरम्यान, दरोडेखोरांनी व्यवस्थापकांवर वार केल्याने ते जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीसीचे प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर शेळके, जिल्हापेठचे बबन आव्हान यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे.दरम्यान, भरदिवसा बँकेत दरोडा पडल्यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. तर पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली होती.