बीड (वृत्तसंस्था) परळी- अंबाजोगाई मार्गावर वैद्यनाथ महाविद्यालयाच्या भागात असलेल्या वनविभाग, तहसील कार्यालयाच्या समोरील मोकळ्या मैदानात एकाचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मयत तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याचे प्रथमदर्शीनी दिसून आले. महादेव दत्तात्रय मुंडे (रा. भोपळा, ता.परळी (वय ४०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
महादेव मुंडे हे भोपळा गावातील मूळ रहिवाशी असून सद्या ते परळीच्या बँक कॉलनी येथे रहायला होते. रविवारी सकाळी महादेव मुंडे यांचा मृतदेह येथील वनविभाग, तहसील कार्यालयसमोरील जागेत आढळून आला. मृतदेहाचे शवविच्छेदन परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. केली. या प्रकरणी मयताचा भाऊ अशोक दत्तात्रय मुंडे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरहरी नागरगोजे हे करीत आहेत. दरम्यान, महादेव मुंडे यांच्या गळ्यावर व गालावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आहेत. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, खरे कारण तपासातूनच समोर येणार आहे.