मुक्ताईनगर (प्रतिनिधी) धारदार चाकूच्या धाकावर भरदिवसा दाम्पत्याला लुटल्याची घटना नायगाव फाट्याजवळ घडली आहे. चोरट्यांनी दाम्पत्याकडून ३ लाख ८५ हजार रुपये किंमतीचे दागिने लुटून पोबारा केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांसह प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. (Road Robbery In Muktainagar)
या संदर्भात अधिक असे की, गोपाल राजाराम महाजन (वय – ६५ वर्षे धंदा -शेती रा. नायगाव ता. मुक्ताईनगर) हे आपल्या पत्नीसोबत फोपनार ता. जि ब-हाणपुर (म.प्र.) येथून नातवाईकाचे लग्नासाठी गेलेले होते. दि. ७ फेब्रुवारी रोजी महाजन दाम्पत्य लग्न आटोपून त्यांची दुचाकी (क्र.एम एच १९ यु ९५२४) हिने इच्छापुर मार्गे नायगाव ता. मुक्ताईनगर येथे घरी परत येत होते. दुपारी साधारण सव्वा तीन वाजेच्या सुमारास नायगाव फाट्यावर ब्रेकर जवळ त्यांची दुचाकी हळू होताच पाठीमागून आलेल्या एक काळया रंगाची विना नंबरच्या बजाज प्लॉटिना वरील अज्ञात लुटारूंनी महाजन दाम्पत्यास थांबवले. त्यानंतर धारदार चाकूचा धाक दाखवत श्री. महाजन यांच्या पत्नीकडील ३ लाख ८५ हजार रुपये किंमतीचे ११ तोळे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी गोपाल महाजन यांच्या फिर्यादीवरून अद्यात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि प्रदिप शेवाळे हे करीत आहेत.
















