पुणे (प्रतिनिधी) – पुण्यातील खराडी परिसरात शनिवारी रात्री एका फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अचानक छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे या कारवाईत आ. एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांचाही समावेश असल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
या रेव्ह पार्टीत कोकेन व गांजासारख्या अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पार्टीदरम्यान पाच पुरुष आणि दोन महिलांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.
रोहिणी खडसेंच्या घरीही छापा
पोलिसांनी या कारवाईनंतर मोर्चा थेट शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या हडपसर येथील बंगल्याकडे वळवला. पोलिसांनी बंगल्यावर छापा टाकत सखोल झाडाझडती सुरू केली असून, काही महत्त्वाचे वस्तू ताब्यात घेतल्याचे कळते. मात्र, त्या वस्तू नेमक्या काय आहेत, याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही.
वैद्यकीय तपासणी आणि चौकशी
प्रांजल खेवलकर यांना अटक केल्यानंतर ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना थेट हडपसरमधील त्यांच्या बंगल्यावर आणण्यात आले. तेथून काही वेळाने पुन्हा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या सर्व घडामोडी पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडल्या.