मुंबई (वृत्तसंस्था) धावत्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आरपीएफ जवानाने केलेल्या गोळीबारात एका रेल्वे पोलिसासह चार जणांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामध्ये चेतन सिंह नावाच्या आरपीएफ कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. पालघर रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली.
राजस्थान ते मुंबई सेंट्रल या जयपूर एक्स्प्रेसमध्ये आज पहाटे पाचच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. ट्रेन पालघरमध्ये पोहोचताच B-5 डब्यात अचानक गोळीबाराचा आवाज झाला. आरपीएफ जवानानेच सहकाऱ्यासह प्रवाशांवर गोळीबार केला. यात चार जणांचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या आवाजाने डब्यात बसलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. गोळी झाडणाऱ्या पोलीस हवालदाराला मीरा रोडजवळ पकडले आहे. हवालदार मानसिक तणावाने त्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
जयपूर-मुंबई ( गाडी क्र. १२९५६ ) ही सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. तेव्हा सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गाडीत सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत असलेला आरपीएफ जवान चेतन कुमार याने एएसआय टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टिकाराम यांच्यासह अन्य तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
आरपीएफ हवालदार चेतन सिंहचा ट्रेनच्या डब्यातील काही प्रवाशांसोबत वाद झाला होता. यावेळी संतापलेल्या चेतन सिंहने प्रवाशांचे दिशेने बंदूक उगारली. मात्र सहकाऱ्याने त्याला थांबवण्याचा आणि शांत राहण्यास सांगितलं. परंतु रागात असलेला चेतन सिंह कोणालाही जुमानला नाही. त्याला थांबवणाऱ्या आरपीएफच्या कर्मचाऱ्यासह तीन प्रवाशांवर त्याने गोळीबार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
गोळीबार केल्यानंतर बोरिवली स्थानकापूर्वी गाडीचा वेग मंदावल्यानंतर आरपीएफ जवान चेतन गाडीमधून उडी टाकून फरार झाला होता. यानंतर ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचली असून, ४ जणांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. फरार आरोपी आरपीएफ जवान चेतनला भाईंदरमध्ये अटक करण्यात आली आहे.