जळगाव (प्रतिनिधी) शहरातील काही बड्या उद्योजकांसह सराफ व्यावसायीकांचे कोट्यावधी रुपये हवाल्यामार्फत मुंबई येथे घेऊन जाण्यासाठी निघाले. परंतु रस्त्यातच शहापूर परिसरात एक वाहनातून सात ते आठ जण येवून त्यांनी ही रोकड लुटल्याची घटना गेल्या आवठड्यात घडली होती. या प्रकरणी काही दिवसांपुर्वी शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून बारा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
१२ पार्सल घेवून मुंबईला जाण्यासाठी निघाले !
मुंबई येथे कमी किंमतीत सोने मिळत असल्याने ते घेण्यासाठी शहरातील पाच ते सहा सराफ व्यावसायीक व उद्योजकांकडील ७ कोटी हवाल्याची रोकड घेवून तो उच्चभ्रू व्यावसायीक दि.१५ रोजी एका बोलेरो वाहनात कुरिअरचे १२ पार्सल घेवून ते मुंबईला जाण्यासाठी निघाले.
रोकड लुटल्यानंतर काढला पळ
शहापूर खर्डी गावालगत गोपाळकृष्ण ढाब्याच्या पुढे इनोव्हा वाहनात आलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी त्यांच्या वाहनाला अडविले. आपण पोलीस असल्याची बतावणी करीत त्यांना काही अंतरावर असलेल्या एका बंद कंपनीच्या मागे दोघांना घेऊन जात वाहनातील गोण्यांमध्ये असलेली रक्कम काढून घेत रिकामे बॉक्स पुन्हा परत वाहनात ठेवून त्यांनी पळ काढला होता.
बारा दरोडेखोरांना अटक
शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडेखोरांनी पोलीस असल्याची बतावणी करीत लुटल्यामुळे सराफ व्यावसायीकांमध्ये खळबळ माजून गेली होती. काही दिवसांनंतर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपासचक्रे फिरवित आठ दिवसात बारा दरोडेखोरांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून काही रोकड हस्तगत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कमी किंमतीत सोने पडले महागात
शहापूरजवळ घडलेल्या घटनेमध्ये हवाल्याची लुटलेली रोकड शहरात असलेल्या तीन घाऊक सोने विक्रेत्यांची असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई येथे कमी किंमतीमध्ये सोने मिळत असल्याने ते घेण्यासाठी नेहमीच मुंबई येथे सोने खरेदीसाठी जात होते. यावेळेस देखील काही व्यापारी एकत्र येऊन त्यांच्याकडील सुमारे सात कोटी दहा लाखांची रोकड घेवून ते हवाल्यामार्फत सोने खरेदीसाठी निघाला. मात्र रस्त्यातच हवाल्याची गाडी रोखत दरोडेखोरांनी त्यांच्याकडील सात कोटींची रोकड लुटून नेली. त्यामुळे कमी किंमतीचे सोने व्यापाऱ्यांना चांगलेच महागात पडले.