चाळीसगाव (प्रतिनिधी) महाविकास आघाडीच्या वतीने चाळीसगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी पोलीस स्टेशन समोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते किसन जोर्वेकर यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना उद्देशून चक्क पिस्तुलीने गोळी घालण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. यामुळे चाळीसगाव तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. भाजपचे पदाधिकारी याबाबत गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. याबाबतचा व्हिडीओ भाजप पदाधिकाऱ्यांनी सोशल मिडियात शेअर केला आहे. धमकीच्या या प्रकारामुळे सुज्ञ चाळीसगावकरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
आघाडीच्या वतीने चाळीसगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी झालेल्या धरणे आंदोलनाच्या ठिकाणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात टाकळी प्रचा गावाचे माजी सरपंच व महाविकास आघाडीचे नेते किसन जोर्वेकर याने आपल्या भाषणात आमदार मंगेश चव्हाण यांच्याविषयी बोलताना “माझ्या नादी लागशील तर पिस्तूलाने गोळी घालून मारून टाकेल रस्त्यावर” अशी जाहीर धमकी दिली. विशेष म्हणजे ही धमकी ज्याठिकाणी दिली त्या ठिकाणी समोरच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन आहे. तसेच त्यावेळी मंचावर तालुक्यातील महाविकास आघाडीचे माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख व नेते पदाधिकारी देखील उपस्थित होते. मात्र, यातील कुणीही या धमकीला विरोध केला नाही.
सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असणाऱ्या चाळीसगावमध्ये एका राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर विद्यमान आमदाराला गोळी घालण्याची जाहीर धमकी देण्याचा प्रकार प्रथमच घडला असून याच्या संतप्त प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या नैराश्यातुन त्यांनी शेतकऱ्यांच्या नावाखाली धरणे आंदोलन करत आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर आगपाखड केली आहे. मात्र, एखाद्याचा जीव घेण्याची भाषा म्हणजे संतापजनक प्रकार असल्याची टीका भाजप पदाधिकारी करत आहेत.
शेतकऱ्यांसाठी १२ दिवस जेल भोगणारे, वारकरी, युवक, आशा, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, सर्व समाजघटकांना न्याय मिळवून देत प्रसंगी पदरमोड करून त्यांची कामे करणारे आमदार मंगेश चव्हाण यांना जीवे मारण्याच्या देण्यात आलेल्या या धमकीचा भाजपकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. हे चाळीसगाव आहे, इथे अश्या विकृत राजकारणाला कधीच थारा मिळाला आणि मिळणारही नाही. आणि अश्या समाजविघातक प्रवृत्तीला पुढे करून जर कुणी राजकारण करणार असेल तर त्याला निवडणूकीत जागा दाखवण्याची ताकद देखील चाळीसगावच्या सुज्ञ जनतेमध्ये असल्याचेही भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.