पुणे (वृत्तसंस्था) अवघ्या महिन्यांपूर्वी लग्न झाल्यानंतर सासरवाडीत पत्नीसोबत शेतात फेरफटका मारत असतांना पतीवर अचानक चार आरोपींनी हल्ला करून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि. ४) मावळ तालुक्यातील गहुंजे येथे घडली. सूरज काळभोर (रा.आकुर्डी) असे हत्या झालेल्या जावयाचे नाव आहे.
सूरज काळभोर येथे गहुंजे येथील संतोष बोडके यांच्या मुलीशी दीड महिन्यापूर्वी लग्न झाले होते. तो आकुर्डी स्टार हॉस्पिटल मागे राहायला होता. सूरज पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नोकरी करत होता. त्याला वडील नसून आई, पत्नी सोबत तो राहत होता. रविवारी तो गहुंजे येथील सासुरवाडीत आला होता. त्यावेळी शेतात फिरत असताना अज्ञात तीन ते चार जणांनी अचानक त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. या घटनेत हल्लेखोर यांनी त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्राने सपासप वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले. दरम्यान, खून कुठल्या कारणाने झाला याचे कारण अद्याप समोर आले नसून तळेगाव पोलिसांनी तपासचक्र फिरवायला सुरुवात केली आहे.