मुक्ताईनगर (प्रतिनिधी) बुलढाणा जिल्ह्यातील शिरपूर येथील बेपत्ता झालेल्या जवानाचा मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली गावालगत असलेल्या विहिरीत मृतदेह आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. संदीप शिवाजी शेळके (२५) असे मृत जवानचे नाव असून दोन दिवसांपूर्वी मुक्ताईनगर पोलिसात बेपत्ताची नोंद करण्यात आली होती.
संदीप शेळके हा तरुण बेळगाव येथे सैन्यात कार्यरत आहे. दिनांक १३ रोजी (शनिवार) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास संदीप हा मित्र समाधान शेळके याची सुटी संपल्याने त्यास मलकापूर येथे सोडण्यासाठी कारने गेला होता. मात्र, तो घरी परत न आल्यामुळे नातेवाईकांकडून त्याचा शोध सुरू करण्यात आला होता. संदीपचा शोध घेत असताना त्याची चारचाकी चिखली गावाजवळ आढळून आली. त्यानंतर मुक्ताईनगर पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली होती.
दिनांक १५ रोजी मिसिंग व्यक्तीचा शोध घेत असताना जवान संदीपचा मृतदेह चिखली शिवारातील हॉटेल भाग्यश्री जवळील एका विहिरीत आढळून आला. पोलिस व गावकऱ्यांच्या मदतीने संदीपचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे आणले असता तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप दूनगहू हे करीत आहे.