गडचिरोली (वृत्तसंस्था) जिल्हा मुख्यालयापासून १८ किमी अंतरावरील व पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पोर्ला गावाजवळ पोर्ला- वडधा मार्गावरील पहिल्या पुलाजवळ एका अनोळखी युवतीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडल्याची घटना शुक्रवारी (२२ डिसेंबर) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी पोर्ला-वडधा मार्गावरील पोर्ला गावाजवळ एका अज्ञात युवतीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत पडला असल्याचे काही लोकांनी पाहिले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लागलीच या घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. अर्धनग्न अवस्थेत असलेल्या युवतीच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अर्धनग्न अवस्थेत युवतीचा मृतदेह सापडल्याने परिसरात विविध चर्चा सुरू आहेत. मृतदेह सापडलेली युवती १९ वर्षाची असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून युवतीची हत्या की आत्महत्या, याबाबतचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. गडचिरोली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.