मनमाड (वृत्तसंस्था) येथील रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर लोहमार्गालगत दोन तरुणांचे मृतदेह एकाच ठिकाणी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून, शहर हादरले आहे. दोन्ही तरुण हे प्रवासी रेल्वेत भेळ विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. नीलेश पगारे आणि आनंद पगारे अशी मृतावस्थेत आढळलेल्यांची नावे आहेत. मात्र, ही घटना अपघात की घातपात याविषयी चर्चांना उधाण आले आहे.
मृतदेह आढळलेले दोन्ही तरुण बाजूलाच असलेल्या गायकवाड चौकातील रहिवासी आहेत. एकाच वेळी दोन तरुणांचे मृतदेह एकाच ठिकाणी आढळून आल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहे. आनंद म्हसू पगारे (वय ३५) व नीलेश धर्मराज पगारे (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला काही अंतरावर असलेल्या रेल्वे केबिनजवळ अप आणि डाउन लाइनच्या मध्यभागी रविवारी (दि. २५) सकाळी दोन मृतदेह निदर्शनास आले. एकाचा मृतदेह लोहमार्गात दोन तुकडे झालेल्या अवस्थेत, तर दुसऱ्याचा मृतदेह लोहमार्गालगत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. तर लोहमार्ग पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. मृतकांच्या अंगावरील कपड्यांची व खुणांची तपासणी केली असता त्यांची ओळख पटली.
रेल्वे पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. या घटनेमागचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या दोन तरुणांचे रेल्वे कटिंग असल्याने त्यांनी आत्महत्या केली की रेल्वेखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला की घातपात झाला, या सर्व बाबींचा उलगडा पोलीस तपासाअंती समोर येणार आहे.