एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोलचे प्रांताधिकारी व त्यांच्या सहकार्यांवर वाळू माफियांनी हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वाळू माफियांनी एरंडोल प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांचा गळा आवळण्याचा प्रयत्नही केला शिवाय महसूल पथकावर हल्ला करीत त्यांच्यावर दगडफेक केल्याची बाब शुक्रवारी रात्री घडल्याने जिल्ह्यातील महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. वाळू माफियांवर कठोर कारवाईची मागणी महसूल कर्मचार्यांमधून होत आहे.
सुरूवातीला हात-पाय तोडण्याची धमकी
एरंडोल तालुक्यातील उत्राण अ.ह.शिवारातील गिरणा नदीच्या पात्रात प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड हे आपल्या महसूल पथकासह शुक्रवारी रात्री अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेल्यानंतर ख्वाजा मिया दर्ग्याजवळ दहा-बारा ट्रॅक्टर्स आढळून आले. पथकाला पाहताच यातील दहा ट्रॅक्टर चालकांनी परधाडे गावाच्या दिशेने धूम ठोकली मात्र दोन ट्रॅक्टर्स तेथेच असल्याने महसूल पथक कारवाई करण्यासाठी वाहनातून खाली उतरले. याप्रसंगी चार ते पाच संशयितांनी महसूल पथकाशी हुज्जत घालत ट्रॅक्टर नेल्यास हात-पाय तोडू, अशी धमकी दिली. यावेळी प्रांताधिकार्यांनी स्वतःची ओळख देत अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी आल्याचे सांगितले मात्र यावेळी संशयितांनी आपल्या अन्य साथीदारांना बोलावले.
प्रांताधिकार्यांचा आवळला गळा
प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, भालगाव मंडळाधिकारी दीपक ठोंबरे, उत्राण तलाठी शकील अहमद शेख, तलाठी विश्वंभर बाळकृष्ण शिरसाठ आदी कारवाई करीत असताना वाळॅू माफियांनी त्यांच्यावर हल्ला चढवत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. संशयितांनी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांना खाली पाडून त्यांना गळा दाबून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला तर महसूल पथकाने संशयितांना बाजूला सारत प्रांताधिकार्यांची सुटका केली. आरोपींपासून जीव वाचवण्यासाठी पथक नदीच्या बाहेर जीव मुठीत घेवून पळत असताना वाळू माफियांनी जोरदार दगडफेक केली. संशयितांनी त्यानंतर दोन ट्रॅक्टर नदीतून पळवून नेले. यावेळी उत्राण पोलिस पाटील प्रदीप तिवारी यांनी संशयित आकाश राजेंद्र पाटील यास ओळखले.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी उत्राणचे मंडळ अधिकारी प्रमोद मेघश्याम गायधनी (57) यांनी कासोदा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आकाश राजेंद्र पाटील, अमोल (पूर्ण नाव माहित नाही), राहुल (पूर्ण नाव माहित नाही), दादाभाऊ (पूर्ण नाव माहित नाही) आणि सागर (पूर्ण नाव माहित नाही) व अनोळखी जमाविरोधात भाग 5, गुरनं.01/2024 भादंवि कलम 353, 307, 143, 332, 379, 323, 504, 506, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1999- 48 (7) व 48 (8) व खाण आणि खनिज अधिनियम 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ हे करीत आहेत.