कोल्हापूर (वृत्तसंस्था) मधुमेहाची आयुर्वेदिक (औषध) पावडर पाण्यातून प्यायल्यानंतर थोड्याच वेळात तोंडातून फेस येऊन मधुकर दिनकर कदम (५९), जयश्री मधुकर कदम (४९) या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना वडणगे (ता. करवीर) गावात बुधवारी सकाळी ८ वाजता घडली. आयुर्वेदिक औषधाची रिअॅक्शन आल्यानेच आई-वडिलांचा मृत्यू झाल्याचा संशय मुलगी गायत्री कदम हिने व्यक्त केला. तर करवीर पोलिसांनी औषधाची डबी ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
एसटी महामंडळातून २०२२ मध्ये सेवानिवृत्त झालेले मधुकर कदम हे शिवाजी पेठेतील लाड चौकात वडिलोपार्जित घरात राहात होते. त्यांना १९ वर्षाची गायत्री आणि १७ वर्षाची विजया अशा दोन मुली होत्या. दरम्यान, मधुकर व जयश्री या दोघांनाही मधुमेह होता. त्यांनी अनेक डॉक्टरांकडे उपचार केले होते. शेवटी वैतागून एका आयुर्वेदिक डॉक्टरकडून पावडर घेतली होती. आठवड्यातून एकदा ग्लासभर पाण्यात पावडर टाकून ते पावडर घेत होते. बुधवारी सकाळी दोघांनीही ती पावडर प्राशन केली. त्यानंतर मधुकर हे दूध आणण्यासाठी डेअरीत गेले होते. पण वाटेतच त्यांना चक्कर येऊन ते खाली कोसळले, तर त्यांची पत्नी जयश्री यांनाही घरी त्रास होऊ लागला.
कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना खासगी वाहनातून तातडीने सीपीआर रुग्णालयात आणले. परंतू डॉक्टरांनी तपासणी करत दोघांना मृत घोषित केले. मधुमेहाची पावडर घेतल्याने आलेल्या रिअॅक्शनमुळेच या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आई-वडिलांच्या अचानक मृत्यूमुळे दोन्ही मुलींना जबर धक्का बसला आहे.
दुसरीकडे कदम दाम्पत्याच्या मृत्यूचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ते शोधण्यासाठी डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. प्रयोगशाळेत त्याची तपासणी केल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे. त्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय पोलीस देखील घेणार आहेत.