बीड (वृत्तसंस्था) पेट्रोल टाकून दोन घरात झोपलेल्या सहा व्यक्तींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी पहाटे हा गुन्हा केज तालुक्यातील ढाकेफळ येथील हनुमान मंदिराशेजारी घडला. दरम्यान नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे अनर्थ टळला. या घटनेत दोघे गंभीर तर चौघे किरकोळ असे सहाजण भाजले आहेत.
सख्खे चुलत भाऊ असलेले गोविंद दिलीप थोरात हे पत्नीसह व वैजेनाथ व्यंकटी थोरात हे पत्नी, दोन मुलासह गावातील हनुमान मंदिरापाशी एकमेकांच्या शेजारीच पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. नेहमीप्रमाणे ते घरात झोपलेले असताना मध्यरात्री २.३० च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याच्या हेतुने त्यांच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावली. पेट्रोलमुळे आगीचा भडका उडाला. त्यामुळे घरातील सर्वजण जागे झालेत.
आगीचे लोळ पाहून गोविंद व वैजनाथसह घरातील लहान मुलांनी आरडाओरड केली. या आरडाओरडीने शेजारी लोक जागे झाल्यामुळे अनेकांनी पेटलेल्या घराकडे धाव घेतली. यावेळी धावून आलेल्या धनराज राजेंद्र थोरात यांनी घराची पत्रे फाडून लहान मुलांसह व सर्वांना बाहेर काढले. या घटनेत वैजेनाथ थोरात यांचा हात व पाय, डोक्याचा बराचसा भाग भाजला आहे. तसेच गोविंद थोरात व त्यांची बायको यांनाही थोड्याफार प्रमाणात आगीने जखमा झाल्या आहेत. या प्रकरणी युसुफ वडगाव पोलिस स्टेशनमध्ये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय काळे हे करत आहेत.
















