प्रयागराज (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची प्रयागराजमध्ये वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेचा संपूर्ण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हल्लेखोर पत्रकार बनून आले होते. वैद्यकीय तपासणीसाठी प्रयागराज येथील मेडिकल कॉलेजला नेण्यात येत असतानाच या दोघांवर गोळीबार करण्यात आला.
गँगस्टर अतिक अहमद याचा मुलगा आणि उमेश पाल खूनप्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला असद आणि त्याचा साथीदार गुलाम या दोघांचा गुरुवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला होता. उमेश पाल हत्या प्रकरणानंतर असद फरार होता. या दोघांच्या मागावर असलेल्या पोलिसांची त्यांच्याशी गुरुवारी चकमक झाली. या चकमकीत असद आणि गुलाम यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची हत्या करण्यात आली आहे. पोलीस या दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना तीन अज्ञातांनी या दोघांवर गोळ्या झाडल्या. या दोघांचीही डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. गोळीबार झाला तेव्हा अतिक आणि अशरफ दोघेही जागीच कोसळले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
अतिक आणि त्याच्या भावावर गोळीबार झाला तेव्हा माध्यमांचे प्रतिनिधी त्यांना काही प्रश्न विचारत होते. दोन्ही भावांनी बोलायला सुरुवात केली तेवढ्यात त्यांच्यावर गोळीबार झाला. काही माध्यमांच्या अहवालात असं म्हटलं आहे की, हल्लेखोर माध्यमांचे प्रतिनिधी बनून तिथे आले होते. हल्लेखोरांनी गळ्यात माध्यमांचं ओळखपत्रदेखील अडकवलं होतं. पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला करणारे तीनही तरुण माध्यम प्रतिनिधी बनून आले होते. लवलेश, सन्नी आणि अरुण अशी नावं हल्ला करणाऱ्या तिघांची असल्याचे सांगण्यात येत आहे. अतीक अहमद आणि अश्रफच्या हत्येनंतर, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या 17 पोलील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याच बरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानाची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे.