बोदवड (प्रतिनिधी) शहरात शिवस्मारक व्हावे, यासाठी सामाजिक कार्यकर्ते विनोद पाडर यांनी बोदवड नगरपंचायत समोर अंगावर पेट्रोल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्यांना वेळीच अटकाव करत ताब्यात घेतल्याने हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. परंतू या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती.
विनोद पाडर यांनी 2 महिन्याआधी ग्रामपंचायतची जागा शोधून द्यावी, ही मागणी नगरपंचायतला निवेदन दिले होते. त्यानुसार जागा शोधून न दिल्यास त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. या मागणीला ठोस प्रतिसाद न मिळाल्याने मंगळवारी रोजी शासकीय विश्रामगृह परिसरात शिवप्रेमी नागरिक जमले आणि मागणी असलेल्या मलकापूर रस्त्यावरील जागे समोर येऊन थांबले. तिथे काही कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास माल्यार्पण करून हे सर्व लोक नगरपंचायत समोर आले. त्यानंतर पाडर यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
प्रसंगावधान राखत पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यांना वेळीच अटकाव करत ताब्यात घेतल्याने हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.
यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी आकाश डोईफोड़े यांनी सदरील अतिक्रमीत जागा ही महसूल अखत्यारीतील असून त्यासंबधी उद्या नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष आनंदा पाटील यांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली आहे. त्यात सन १९८१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत काळात झालेल्या ठरावा प्रमाणे शिवस्मारकाची नियोजित जागा ही मलकापूर चौफुलीवर आहे. त्यासंबधी तसा ठराव करून सदर जागा महसूल विभागाकडून हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येईल व नगरपंचायत मंजुरी मिळाल्यास जागा लवकर उपलब्ध करून देण्यात येईल, असे तोंडी आश्वासन दिले.
शिवस्मारक जागेचा प्रश्न निर्माण कसा झाला?बोदवड शहरात शिवाजी महाराजांचे एक चांगले स्मारक असावे अशी गेल्या अनेक वर्षांपासून अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यासाठी ४ जानेवारी १९८१ रोजीचा ग्रामपंचायतीचा ठराव घेण्यात आला होता. त्यात बस स्थानकाजवळील मुक्ताईनगर भुसावळ/जामनेर रस्त्यालगत मलकापूरकडे जाणारा रस्ता एकत्र येतो, तेथील जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्या ठिकाणी अतिक्रमणे होऊन दुकाने बांधण्यात आली. ही अतिक्रमणे काढण्यात न आल्याने शिवस्मारक होऊ शकले नाही. या आंदोलनामुळे पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला असून पुढे काय होणार?, याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे. या जागेवरील संपूर्ण अतिक्रमण जमीनदोस्त करून ती जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका करिता आरक्षित करण्यात यावी तसा ठराव आजच्या मासिक बैठकीत घेऊन जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे सविस्तर माहिती पाठवून संबंधित अतिक्रमण धारकांना नोटीस देण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्ते विनोद पाडर यांनी दिली आहे.
















